Friday, June 26, 2009

आषाढी




आषाढी महिना येताच आठवण आली ती पंढरपूर वारीची. लगबगीने तयारी केली. गर्दीतून वाट काढत निघालो. मजल-दरमजल करून थकलो-भागलो; परंतु उत्साहाने पंढरपुरास पोचलो. मोठा टप्पा पार झाला. रांगेमध्ये उभा राहिलो. कधी "श्रीहरी', कधी "विठ्ठल-विठ्ठल', तर कधी "पांडुरंग-पांडुरंग' करत होतो. मध्येच लेकराबाळांची आठवण येत होती. थकल्या भागल्या अवस्थेमध्ये धक्काबुक्की करत धडपडत एकदाचा गाभाऱ्यामध्ये पोचलो. समोर बघितले आणि एकदम दचकलो, घाबरलो! अहो, गाभाऱ्यातील सावळ्या विठुरायाची मूर्तीच दिसेना. नुसताच चौथरा दिसत होता.
वाटलं, भास झाला असेल! डोळे चोळून चोळून बघितले, पण नाही...मूर्तीच नाही! इकडे तिकडे बघितले, विचारले, तेही म्हणाले, "अहो, खरंच मूर्ती गायब झाली काय?' बापरे! आता काय होणार, कसे होणार, कोणाला सांगितले तर खरं वाटेल का? विश्‍वास कोण ठेवणार? काही सुचेना। सैरभैर झालो. हृदयाची गती वाढती. अनिश्‍चित झाली. मन गाभाऱ्याहून हटायला तयार नव्हते. परंतु, गाभारा रिकामाच वाटत होता, भासत होता. इतक्‍यात गाभाऱ्यातून आवाजांच्या लहरींची स्पंदने उमटली...


""आलास बाळा''... आणि परत मंद सुगंधी हास्याच्या लहरी उमटल्या। ""कशी झाली रे वारी? बरा आहेस ना? कुठं दुखलं-खुपलं नाही ना रे?'' मी नुसतीच मान हलवत राहिलो। "हो-हो' - "नाही-नाही' करत राहिलो। तेवढ्यात तीच स्पंदने उमटली। ""अरे बाळा, वाटेत आपला नामा भेटला का रे?''... आणि क्षणार्धात मस्तकात विजा चमकल्या। अरे, आपल्याला कोठे नामा भेटला? अरे बापरे! केवढी चूक झाली. नाम न घेताच मी आलो. मग नामा भेटणार कसा? मी म्हणालो, ""नाही हो देवा, मी नामच घेतले नाही. मग मला नामा कसा भेटेल?''परत आतून हास्यरूपी स्पंदने उमटली. ""अरे, चोखा होता का रे संगतीला?''""अहो देवा, आयुष्यभर कोणताही व्यवहार चोख केलाच नाही. तर चोखा कसा भेटणार?''""अरे, गोरा तरी आला असेल ना?''परत मी मान हलवली, ""नाही हो देवा, जन्मभर काळीच कृत्ये केली, मग गोरा भेटेल कसा?''""मग ज्ञाना तर नक्कीच दिसला, भेटला असेल ना?''""नाही हो देवा, आजपर्यंत अज्ञानाच्या अंधकारातच भटकलो. मला "ज्ञाना' दिसलासुद्धा नाही.''""अरे, सोपाना तर नक्कीच भेटला असेल?''""नाही हो, भक्तिमार्गाची सोपी वाट सोडली. नको त्या वाटा चोखाळल्या. मग देवा सोपाना कसा भेटणार?''""अरे, मग सावता भेटला असेल की?''""नाही...नाही हो देवा, आयते खाणाऱ्या-आळशी-कामचुकार अशा माझ्यासारख्या खादाडाला सावतासारखा कर्मयोगी कसा भेटणार? मी त्याच्याकडे कधी गेलोच नाही हो.''""अरेरे! मग निवृत्तीचे दर्शन, भेट झाली का? का तेही नाही?'' ""नाही हो, माझे-माझे- मी-मी मलाच पाहिजे- अशा हव्यासाच्या पाठी मी लागलेलो. देवा, निवृत्तीची वाट मला सापडलीच नाही. मग निवृत्तीचे दर्शन कधी होणार?''""अरे मग मुक्ताई तरी दिसली का? का अंधारच दिसतोय.''""नाही हो देवा, वासनेच्या फेऱ्यात हा माझा जीव मोह-मायेच्या दुनियेत रमला आहे. त्याला मुक्ताई कशी दिसणार?''""अरे मग जनी भेटली असेल की? संगतीला असेलच की.''""नाही हो देवा. माझ्याच सुखाच्या शोधात मी वास्तवाला-शाश्‍वताला-सेवेला विसरलो. दानधर्म कधी केलाच नाही. माझ्या हातून अन्नदान कधी घडलेच नाही. परोपकाराविषयी मी अनभिज्ञच राहिलो. अशा मज पामराला ही जनाई (लोक) कशी भेटणार देवा? तुम्हीच सांगा देवा.''आतून धीर गंभीर स्पंदने उमटली. ""अरे बाळा, वत्सा, नामा-चोखा-ज्ञाना-सोपाना-गोरा-सावत्या-निवृत्ती-मुक्ताई-जनी-जनाई ही अध्यात्म ज्ञानाने चोखडी अशी माझीच रूपे आहेत बरे. आता अशा तुझ्यासारख्या अज्ञानी जिवाला माझे तेज-माझी प्रखरता कशी बरे सहन होईल? आधी त्यांची सोबत कर. त्यांचा समागम कर. त्यांचे आशीर्वाद घे. मग हे माझे निर्गुण-निराकार, सगुण-साकार, व्यक्त-अव्यक्त सावाळ्या रूपाचे तुला दर्शन होईल, साक्षात्कार होईल. अरे, हे सर्व जाणून घे, म्हणजे तुझी वारी पूर्ण होईल, नाही तर फक्त कष्ट होतील, नुसतेच श्रम होतील.''आणि काय आश्‍चर्य! निराश मनाने पश्‍चात्तापदग्ध झालेला असा मी परत वळणार, तोच गाभाऱ्यातून तेजस्वी प्रकाशाचा किरण माझ्या मनपटलावर पडला. मी त्या तेजामध्ये न्हाऊन निघालो.माझे ज्ञानचक्षू जागे झाले.मी पाहतच राहिलो. अहो, नामा-चोखा-ज्ञाना-सोपाना-गोरा-सावत्या-निवृत्ती-मुक्ताई-जन-जनाई या सर्वांनी फेर धरला होता... कोणाभोवती फेर धरला होता. मी अधीर होऊन बघत होतो. तो आनंद काही वेगळाच होता. संगीत काही वेगळेच होते. अहो त्यांनी ज्याभोवती फेर धरला होता, ते प्रत्यक्ष माझेच स्वरूप होते. मीच सावळा विठू होतो. मीच तो विठ्ठल होतो. मीच नामा-चोखा होतो. मीच सर्व काही झालो होतो. माझ्या नामाचा ध्वनी मीच ऐकत होतो. "जय जय पांडुरंग हरी- जय जय पांडुरंग हरी' आज सर्वार्थाने वारी पूर्ण झाली. माझ्या वारीची सांगता झाली. श्रीहरी- श्रीहरी- श्रीहरी- श्रीहरी बघा बरे,नामा-चोखा-ज्ञाना-सोपाना-गोरा-सावत्या-निवृत्ती-मुक्ताई-जनाई, आणि हो ज्याच्या भेटीकरिता हे सावळे परब्रह्म सगुणात साकार झाले, तो आमचा पुंडलिक का दिसला नाही हो? अहो खरं आहे हे. "मातृदेवो भव-पितृदेवो भव' याचाच विसर या जगताला पडला. त्या जगतामध्ये कसे राहायचे म्हणून तो कोठे तरी निघून गेला. तो परत येईल का? कोठे असेल तो? तो चंद्रभागास्वरूप होऊन गेला.




मदन कुलकर्णी, कसबा पेठ, पुणे.