जपानमधे रजनीकांत नाही म्हणूनच आपत्तींचा त्रास असावा
आमची किती बोलकी प्रतिक्रिया ही तिथेही अवतार त्या अण्णाचा व्हावा
केवळ लुंगीच्या वाऱ्याने ज्याच्या निसर्गही भयभीत होईल
समुद्रदेखील दडीच मारून अगदी गरीब गोगलगाय होईल
तो रजनीकांतच काय तेथे महात्मासुद्धा एकही नाही
महापुरुष वा राष्ट्रपुरुषही चौकाचौकात उभाच नाही
तरीही राष्ट्र ते महान झाले नागरिकांच्या स्वयत्नांनी
करून कठोर पालन कर्तव्याचे ना हक्कांच्या मागण्यांनी
ना हक्कभावना दैववाद अन अलौकिक पुरुषोत्तमांचा
चमत्कार तो भगीरथासम पण छोट्याश्याच खारींचा
त्याच नम्रपणाने जिद्दीने ते सेतू सागरी किती बांधले
जरी थोडीशीच शिबंदी तरीही कसे अटकेपार घोडे गेले
इंग्रजी भाषा अवगत नाही तरीही सावकार साऱ्या जगाचे
आपत्ती त्या कितीही येवो तरीही दर्शन ना असहायतेचे
प्रतिक्षा नाही अवताराची ना दैवाला कधीही दोष देणे
प्रत्येक हाती कुदळ फावडे ते म्हणून चमत्कारांचे लेणे
तोच चमत्कारही येथेसुद्धा गरीब रयतेनेच केला होता
जरी भवानीची तलवार घेऊन शिवशंकरही अवतरला होता
कारण प्राणप्रेरणा स्वराज्याची नव्हती चाकरी भोसलेकुळाची
नागडी उघडी पोरे उभी राहिली खाल खेचण्या दिल्लीकराची
ती स्फुर्तीच होती स्वबळावर त्या मंगल स्वप्नपूर्तीसाठी
बाजी तानाजी पावन झाले मुक्तीच्याच लगीनासाठी
जरी ती सहस्त्र त्सुनामींची संकटे अन वज्राघातांचीच मालिका
गडकिल्ले आरमार उभारून आम्हीही रोखली काळघटिका
आनंदभुवन येथे सजले नवप्राण लाभले मृत देशाला
केवळ जपानमध्ये नाही तोच चमत्कार सह्याद्रीत झाला
कोणी केला कसा केला का मंत्राने वा तंत्राने
कसे अचानक दैव फिरले का कोणाच्या अवताराने
होती प्रयत्नांचीच पराकाष्ठा अन प्रबळ इच्छाशक्ती आमची
आमचा गनिमी कावा पाहून झाली त्रेधा साऱ्या संकटांची
राजा पडला तरीही येथे कबर गनिमांचीच खोदली
येथील कोमल अबलासुद्धा ती मर्दानी तनुजा झाली
डोहाळे ज्यांना स्वातंत्र्याचे हट्टही केवळ पराक्रमाचा
तो पोटशूळ त्या जिजाईन्चा सुटला त्रिशूळ महाराष्ट्राचा
त्या अस्मानी संकटांस साऱ्यां अन गेला भेदून कळीकालाही
का विस्मरण त्या इतिहासाचे का पुनरावृत्ती अजुनी नाही
का स्फुर्तीसाठी जावे लागे ती जपानचीच धूळ घेण्या
कसे करावे स्वसंरक्षण साऱ्या संकटांतून जीवघेण्या
शिकण्यासाठी पुष्कळ झाला तो मंत्र मावळखोऱ्यामधला
जेथे असामान्य आपत्तींवरही घातला सामान्यांनीच घाला
अशा उच्च ध्येयप्रेरणेने दुर्बल जनता जेथे उभी राहते
चमत्कार वा अवतारांची कधीही ना कमतरता तेथे
आमचे दैववाद व्यक्तिपूजा अन हक्क स्वार्थ सारे सोडून
ती तीव्र वेदना सतत स्मरावी विस्मरणाची गुंगी झटकून
सैनिक उभे ठाकतील मातीतूनही जपानी असो वा मराठी
होईल राखेतूनही गरुडभरारी या देशाच्या उत्कर्षासाठी
शून्यातून ब्रम्हांड होईल ती पुन्हा सृष्टी शिवरायांची
चक्रावून सारे विश्व देईल भेट आम्हाला स्तुतिसुमनांची
----